सौ. वंदना सतीश तिडके या अकोला येथील शिक्षिका, कवयित्री व लेखिका असून त्यांनी मराठी साहित्याला आपली संवेदनशील दृष्टी आणि सामाजिक जाणिवांची समृद्ध देणगी दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे जन्मलेल्या सौ. तिडके यांनी मराठी वाङ्मयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तब्बल सतरा वर्षे अध्यापन क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी विद्यार्थ्यांसोबतच साहित्यविश्वातही आपला ठसा उमटवला आहे. ‘स्पंदन’ हा त्यांचा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह आहे.
‘स्पंदन’ हा काव्यसंग्रह भावनांच्या, विचारांच्या आणि सामाजिक वास्तवाच्या सूक्ष्म जाणिवा व्यक्त करणारा महत्त्वपूर्ण साहित्यिक दस्तऐवज आहे. लेखिकेची संवेदनशील वृत्ती, जीवनानुभव आणि सामाजिक भान या संग्रहातून प्रकर्षाने जाणवते.
या कवितांमध्ये स्त्रीमनाची आर्त हाक, निसर्गाशी असलेले आत्मीय नाते, मानवी नात्यांतील गुंतागुंत तसेच आजच्या बदलत्या समाजातील विसंगती यांचे प्रभावी चित्रण आढळते. बहुतांश कविता मुक्तछंदात असून, साध्या पण अर्थगर्भ शब्दांतून खोल भावनांची मांडणी करण्यात आलेली आहे. लेखिकेची भाषा सहज, प्रवाही आणि मनाला भिडणारी आहे.
स्त्रीवादी जाणिवेचा ठसा या संग्रहातील अनेक कवितांमध्ये स्पष्टपणे उमटतो. स्त्रियांवरील अन्याय, त्यांची मानसिक घुसमट, तसेच त्यांच्या अंतर्मनातील संघर्ष लेखिकेने अत्यंत प्रांजळपणे मांडला आहे. त्याचबरोबर निसर्गकवितांमधून कृतज्ञतेची भावना आणि जीवनातील सकारात्मकतेचा संदेशही दिला आहे.
आजच्या समाजातील वाढती स्पर्धा, द्वेष, मत्सर आणि माणुसकीचा ऱ्हास या विषयांवर लेखिकेने नेमके आणि प्रभावी भाष्य केले आहे. “कालाय तस्मै नमः” या कवितेतून बदलत्या सामाजिक वास्तवाचे विदारक चित्र समोर येते –
प्रेम, जिव्हाळ्याची जागा
द्वेषाने काबीज केलीय
माया ममतेची जागा
मद, मत्सराने घेतलीय
इकडे तिकडे सगळीकडे
आता स्पर्धा मोठेपणाची
संपत चाललीय माणुसकी
ही वास्तविकता जगाची
या ओळी समाजातील नकारात्मक प्रवृत्ती, मानवी मूल्यांचा ऱ्हास आणि भावनिक नात्यांतील कोरडेपणा प्रभावीपणे अधोरेखित करतात.
या काव्यसंग्रहात एकूण पन्नास कविता समाविष्ट असून त्यामध्ये समाज, राजकारण, निसर्ग, स्त्रीजीवन, मानवी नाती, अध्यात्म, ग्रामीण वास्तव, शेतकरी जीवन, महामारीचा अनुभव, मराठी भाषेचा अभिमान, तसेच वैयक्तिक भावविश्व यांचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडले आहेत.
‘शब्द’, ‘राजकारण’, ‘महिमा मराठीचा’, ‘आषाढीची वारी’, ‘हो, दुर्गा तू’, ‘निसर्गमाता’, ‘जीवनवाट’, ‘वृक्ष व मानव’, ‘मायबाप’, ‘कोरोना’, ‘कालाय तस्मै नमः’, ‘स्त्री’, ‘शेतकरी’, ‘भ्रष्टाचार’, ‘संत गाडगेबाबा’ आणि ‘सांजवेळ’ यांसारख्या कवितांमधून सामाजिक भान, आध्यात्मिक चिंतन, निसर्गप्रेम आणि मानवी संवेदनशीलता यांचा सुंदर संगम साधला आहे.

या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक व माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके यांची पाठराख लाभली असून, कवी उद्धव गावंडे यांची प्रेरणादायी प्रस्तावना संग्रहाचे साहित्यिक मूल्य अधिक दृढ करते. याशिवाय, मुक्ता पब्लिकेशन, अकोला यांनी केलेले दर्जेदार मुद्रण, सुबक मांडणी आणि स्पष्ट अक्षररचना यामुळे पुस्तकाची सौंदर्यपूर्ण छाप अधिक उठून दिसते. साहित्य आणि मुद्रण गुणवत्ता यांचा सुरेख संगम ‘स्पंदन’मध्ये अनुभवायला मिळतो.
मराठी काव्यविश्वात हा संग्रह निश्चितच आपले वेगळे स्थान निर्माण करेल, यात शंका नाही.
समीक्षण – सागर बाबाराव लोडम, अकोला
मो. 9850471520
