अ. श. देशमुख यांची “विराणी”

cover a s deshmuk

कवी अ. श. देशमुख हे कवी, कथाकार व ललित लेखक आहेत. त्यांचे इंद्रायणी (१९९२), रानचिमन्या आणि आताचा विराणी हा कविता-संग्रह प्रसिद्ध झाला आहे. विराणी ही कविता म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांची सांगता आहे. त्यांनी आपल्या कवितेत मोठ्या प्राणपणाने जपलेली लाखपुरी गावाची साहित्य, कला व संस्कृतीची परंपरा आजही जिवंत ठेवली आहे; याचा अभिमान अधिक आहे.

कविवर्य स्व. उ. रा. गिरी हे खरे तर आपल्या जीवनाला जोडून येणाऱ्या सौंदर्यवादी परंपरेतील मोठे कवी. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या वैभवाने त्यांच्या कवितेच्या मैफिली ऐकलेल्या आहेत. कोणताही कलावंत आपल्या कलेसह एकटा कधीच आलेला नसतो; जाताना तो आपल्या कलाकृतींसह एका परिसराचा सांस्कृतिक ठेवा ठेवून जात असतो. तसाच ठेवा त्यांनी आपल्या प्रभावाच्या माध्यमातून लाखपुरी नावाच्या एका खेड्यात आपल्या कवितेने जोपासला आहे. त्यात विष्णू रा. गिरी, प्रेमरतन पुरोहित ते उ. रा. गिरी यांची नात प्रियंका गिरी—मराठी गझलेच्या क्षेत्रात आपल्या आबांची परंपरा जोपासत आहे.

आपली कविता आपल्या गावाच्या सांस्कृतिकतेला विसरणारी नाही. ते आपल्या कवितेतून सांगतात—
“माझ्या गावाचे वैभव । देवालय शंकराचे ।
त्याचा कळस सोनेरी । निळ्या अंबरी चकाके ।”

या कवितेतील चकाकणारे निळे अंबर म्हणजे गावातील कला-संस्कृती दूरवर नेणारे कल्पनेत विहरणारे पक्षीच आहेत. प्रेमरतन पुरोहितांसारखा शाहिरी व गझल लिहिणारा हिंदी भाषिक कवीही या गावाने दिला आहे. देशमुखांची कविता नुसती सौंदर्यवादी न राहता आजच्या जीवनजाणिवांची कविता ठरते.

“काळी रक्तांत नाहते । वाहे बांधातून आंसू ।
लाज कायेची झाकाया । फक्त आभाळाचे नेसू…”

या ओळींतून काळ्या आईच्या वेदना आणि शेतकऱ्यांचे दुःख कवितेतून मांडले आहे. जगाला जगवणारा आज उपाशी आहे—ही आर्तता त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. म्हणूनच ही कविता खऱ्या अर्थाने विराणी आहे. विराणी म्हणजे दुःखात भिजलेला आर्त स्वर. तुकाराम यांच्या विराणीमधून आलेल्या वेदनांचा ठेवा हे आपले सांस्कृतिक संचित आहे.

या कवीने नुसत्या कविता नाही तर गझलेचाही साज अनुभवातून मांडला आहे—
“कळ सोसल्या क्षणांची, आबाळ जाहलेली।
अनुबंध पाकळ्यांचे हळूवार गुंफितो मी…!”

या गझलेतून सामाजिक व कौटुंबिक भान जपलेले दिसते. वेदनांची हळूवार गुंफण आणि आजच्या सामाजिक वास्तवाचे दर्शन घडते. कविता ही दुःखाच्या अभिव्यक्तीचे प्रभावी साधन आहे; कवी हा त्या माध्यमाचा वाहक असतो—समाज, संस्कृती आणि कलेचा प्रेषित.

देशमुखांच्या कवितेत देशभक्तीचाही अभिमान दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे वैभव आणि अखंड भारताचा गौरव त्यांच्या कवितेतून ओसंडतो—
“राष्ट्रधर्म पाळून तूच रे, न्यायनीतीचे मर्मचि फळले ।
भारतभूच्या महिनतेचा, तू प्रेरक अध्याय । छत्रपती शिवराय…”

या संग्रहात गावाचे धार्मिक-सांस्कृतिक वैभव, तसेच वऱ्हाडी बोलीतील कविता लक्षवेधक ठरतात. कविता लेखनाबरोबरच त्यांनी कथा व ललित लेखनही केले आहे. विविध पुरस्कार, संमेलनांची अध्यक्षपदे अशा बहुआयामी वाटचालीमुळे त्यांचा परिचय अधिक व्यापक होतो.

अशा या बहुआयामी कवी अ. श. देशमुख यांच्या कवितेला मनःपूर्वक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन!

— दा. गो. काळे

प्रकाशक : मुक्ता पब्लिकेशन, अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *