कवी सुनील ढोकणे लिखित ‘स्मृतिगंध’ : संवेदनांचा दरवळ आणि वास्तवाचे प्रभावी प्रतिबिंब

d2
मराठी काव्यपरंपरेत नव्या संवेदनांचा आणि वास्तवदर्शी जाणिवांचा स्पर्श घडवणारा ‘स्मृतिगंध’ हा सुनील ढोकणे यांचा पहिला काव्यसंग्रह लक्षवेधी ठरतो.  मुक्ता पब्लिकेशन,  अकोला यांनी प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह आशय,  भाषा आणि भावविश्व यांच्या  दृष्टीने उल्लेखनीय ठरतो. या काव्यसंग्रहाला डॉ. चिंतामण कांबळे यांची विचारगर्भ प्रस्तावना लाभलेली असून पाठराख म्हणून रविंद्र जवादे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच डॉ. नासिरोददीन अन्सार (साहित्यिक, समीक्षक व माजी गटशिक्षणाधिकारी) आणि किशोर बळी (सुप्रसिद्ध मराठी कवी, गझलकार, गीतकार, लेखक, निवेदक व अभिनेता, स्टँड- अप कॉमेडियन) यांसारख्या मान्यवरांच्या शुभेच्छांनी या काव्यसंग्रहाची साहित्यिक उंची अधिकच अधोरेखित झाली आहे.
‘स्मृतिगंध’ या शीर्षक कवितेतूनच कवीच्या भावविश्वाची दिशा स्पष्ट होते. आठवणींचा ओलावा, मनातील तरलता आणि मिलनाच्या भावनांचा सूक्ष्म आविष्कार या कवितेतून अनुभवास येतो. “मेघ बरसती थेंब, मन झाले ओलेचिंब” अशा ओळींतून निसर्ग आणि भावना यांचा सुंदर संगम साधलेला दिसतो.
‘पोशिंदा’ ही कविता शेतकÚयाच्या वेदनेला आवाज देणारी आहे. “मी जगाचा पोशिंदा” असे अभिमानाने म्हणणाÚया शेतकÚयाच्या जीवनातील विसंगती आणि दुःख कवीने प्रभावीपणे मांडले आहे. सामाजिक वास्तवाचे भान या कवितेत प्रकर्षाने जाणवते.
‘ते गुलबास दिवस’ या कवितेत बालपणातील निरागसता आणि निष्कपट आनंदाचे चित्रण अत्यंत हळुवारपणे केले आहे. बाबांच्या छायेतले दिवस, चिंता-विरहित जीवन आणि मोठेपणाच्या भ्रामक कल्पना यांचे आत्मीय चित्रण वाचकाला आपल्या बालपणात घेऊन जाते.
‘जागे व्हा’ ही कविता प्रबोधनपर असूनही उपदेशात्मक वाटत नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची आठवण करून देत कवी समाजातील विसंगतींवर भाष्य करतो. “शिकलेली पिढी मात्र शिकून अडाणी झाली” ही ओळ आजच्या वास्तवावर थेट प्रहार करणारी आहे.
या संग्रहातील ‘तिळ गुळ घ्या गोडगोड बोला’, ‘लेखणी’, ‘संवाद पाहिजे’, ‘ग्रहण’, ‘विद्या’, ‘थोर संत’, ‘चला गड्यांनो’, ‘खंत’, ‘जोती बनावे’, ‘करावे मनाचे’, ‘आशादीप’, ‘सिद्धी’, ‘बाप’, ‘डोळस आंधळे’, ‘आम्ही’, ‘पारख’, ‘संभव-असंभव’, ‘प्रयत्नांती परमेश्वर’, ‘कर्मयोगी गाडगेबाबा’, ‘नारी शक्ती’, ‘ज्ञानदीप बाबासाहेब’, ‘परिवर्तन’, ‘वंदन गुरुंना’, ‘कन्यारत्न’, ‘निःशब्द’, ‘भय’, ‘कशासाठी’, ‘गरिबी’, ‘प्रेमपिसारा’, ‘मन तरंग’, ‘एकतेची धार’, ‘जीवनमंच’, ‘विश्वास’, ‘स्वप्नपरी’, ‘जीवनवाट’, ‘पुष्प’, ‘दिवाळी’, ‘सत्याभास’, ‘ते क्षण’, ‘व्यथा’, ‘बहर’, ‘तू ये’, ‘नवं उमेद’, ‘ऋतू आठवणीचा’, ‘सर क्षणाची’, ‘मेघधारा’, ‘माझ्यानंतर’, ‘आचार’, ‘मित्र’, ‘श्रद्धा’, ‘मुकप्रेम’ अशा विविध विषयांवरील कविता समाविष्ट आहेत. या शीर्षकांवरूनच कवीच्या विचारविश्वाची व्यापकता लक्षात येते.
‘गझल’ या कवितेत कवीने पारंपरिक गझल शैलीचा प्रभावी वापर केला आहे. ग्रामीण वास्तव, शेतकÚयाची स्थिती आणि काळाची विसंगती यांचे सूचक चित्रण या गझलेतून होते.
‘बहर’ ही प्रेमकविता अत्यंत कोमल आणि भावस्पर्शी आहे. मिलनाची आस, विश्वासाची गाठ आणि नव्या संसाराची स्वप्ने यांचे चित्रण साध्या पण प्रभावी शब्दांत केले आहे.
कवीची भाषा ही सहज, सरळ आणि संवादात्मक आहे. अलंकारिकतेचा अतिरेक न करता प्रतिमांचा योग्य वापर केल्यामुळे कविता जिवंत वाटतात. आशय मांडताना कवी कुठेही कृत्रिमता किंवा प्रबोधनाचा अट्टाहास करत नाही, ही या संग्रहाची मोठी जमेची बाजू आहे.
एकंदरीत, ‘स्मृतिगंध’ हा काव्यसंग्रह नव्या पिढीतील कवीच्या प्रामाणिक अभिव्यक्तीचा दस्तऐवज आहे. सुनील ढोकणे यांची काव्यदृष्टी, भाषेवरील पकड आणि आशयातील वैविध्य लक्षवेधी आहे. हा संग्रह रसिकांच्या मनात नक्कीच स्थान निर्माण करेल आणि कवीच्या पुढील साहित्यिक प्रवासासाठी एक भक्कम पायाभरणी ठरेल.

कवितासंग्रह : ‘स्मृतिगंध’
कवी : सुनील ढोकणे
प्रकाशक : मुक्ता पब्लिकेशन, अकोला
स्वागत मूल्य : 150 रूपये

d1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *