सुगरण पक्षाकडे फक्त एक चोच आहे आणि या चोचीने काडी, काडी गोळा करत तो खोपा तयार करतो. तो खोपा केवळ सुंदरच नसतो, तर मजबूत, टिकाऊ आणि पूर्ण संरक्षण देणारा असतो. त्या पक्षाकडे केवळ एकच चोच असते; ईश्वराने मात्र आपल्याला दोन हात व दहा बोटं दिली आहेत. म्हणजेच आपली निर्माणशक्ती कितीतरी पटीने जास्त आहे, पण त्यासाठी इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे, हा सुंदर संदेश देऊन जाणारा हा लघुकथा संग्रह आहे.
2021 पासून साहित्य क्षेत्रात पाऊल टाकून, एकापाठोपाठ दरवर्षी 2025 पर्यंत सहा काव्यसंग्रह प्रकाशित करणारे डॉ. नारायण अंधारे, आणि हा सगळा साहित्यिक प्रपंच सेवानिवृत्तीनंतर उभा करणारे डॉ. नारायण अंधारे, बरं, यानंतर मी त्यांना एक प्रेमळ, स्नेहपूर्ण इशारा दिला की आता तुमचं पुढचं पुस्तक काव्यसंग्रह असता कामा नये.
त्यांनी हा इशारा एवढा मनावर घेतला की लगेच 41 कथांचा कथासंग्रह प्रकाशित करून माझी बोलतीच बंद केली. मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर त्यांना काही जमेल; पण तब्बल 41 कथांचा हा कथासंग्रह, तोही त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवशी, म्हणजे 25 एप्रिल 2026 रोजी प्रकाशित झाला.
ह्या सर्व कथा सत्यकथा प्रकारात मोडतात. काही कथांना कथा म्हणावं की काय, असाही प्रश्न मला पडला आहे, कारण बऱ्याच कथा या व्यक्तीचरित्रात्मक आहेत; काही ललित, तर काही अनुभवलेख वाटतात.
काही का असेना, त्यांनी कथासंग्रह म्हणून हे पुस्तक प्रकाशित केलं.
बरं, एवढं सगळं 41 प्रसंग, घटना, पात्रं आणि सगळ्या गतकाळातील स्मृती जतन करून ठेवणं, मला तर नवल वाटतं.
‘दोन हात दहा बोटं’ या कथेत सुगरणीचा खोपा पाहून आणि त्यातून प्रेरणा घेऊन एक हताश युवक उत्तम मूर्तिकार बनतो, ही सत्य घटना या कथेत आहे. ‘फसवा पीक विमा’ ही कथा एक प्रकारची सत्य बातमी असल्याचे भासते. बऱ्याच कथांमधून त्यांनी व्यक्तीरेखांना कथेत रूपांतरित केलं आहे.
उदा. टेंभुर्णीकर गुरुजी, द. ना. पाटील, क्रिकेट वेडा चंदू, फेसकॉमचा शंखनाद, अण्णासाहेब अत्तरकर, निंबू सेठ, गाडगे साहेब, कोकाटे साहेब, यादव वक्ते, महादेव पाटील, पातूरचे गझलनवाज आदी.
आपल्या कथासंग्रहात अमर जवान स्व. कैलास निमकंडे यांनाही वंदन केलं आहे.
‘लग्नात आनंदाची बातमी’, “कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये” ही सूचना ऐकून वऱ्हाडी संतप्त झाले, ही बाब साधी; पण ह्याही घटनेचं त्यांनी कथेत रूपांतर केलं आहे. ‘ग्रामदैवत’ तसं पाहता हा एक माहितीपर लेख असल्याचं जाणवतं.
डॉ. नारायण अंधारे यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देणारे त्यांचे बंधू प्रकाश अंधारे व मित्र स्व. यादव वक्ते या बाबींचीही त्यांनी कथा साकारली आहे. सदाशिव या व्यक्तीला ‘मोती’ नावाच्या कुत्र्यामुळे दोनदा जीवदान लाभले. त्या प्रसंगाची ‘मोती’ नावाची कथा.
तर अशा प्रसंग, घटना, व्यक्ती, वल्ली स्मृतीत ठेवून त्याचं कथासंग्रहात रूपांतर करणारे डॉ. नारायण अंधारे, विरळच! घटना, प्रसंग, व्यक्ती आठवत असले तरी त्यांना शब्दांत मांडणं एवढं सोपं नसतं; हे कसंब अंधारेना साधलं, ही एक वेगळी किमया आहे.
प्रकाशक क्रांतिरत्न प्रकाशन, जठारपेठ, अकोला असून मुद्रक सागर लोडम हे आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रकाशकांनीच तयार केले असून ते खूप बोलके आहे. कथासंग्रहाची मांडणी, कागद, बाइंडिंग अप्रतिमच आहे. जिद्दीने तयार केलेल्या ह्या कथासंग्रहास भरभक्कम प्रतिसाद लाभेल व लाभो ह्या शुभेच्छा.
कथालेखक : डॉ. नारायण अंधारे, शिर्ला (अंधारे), ता. पातूर, मो. 9465601549
देणगी मूल्य : 150/,
समीक्षक : तुळशीराम बोबडे, अकोला, मो. 9579242801
