मराठी साहित्य परंपरेत चारोळी हा अत्यंत सूक्ष्म, पण प्रभावी काव्यप्रकार मानला जातो. कमी शब्दांत जीवनाचे गहिरे सत्य मांडण्याची ताकद चारोळीत असते. कवी प्रल्हादराव मोतिरामजी बोचरे यांचा ‘बासुंदी’ हा चारोळी संग्रह याच परंपरेला समृद्ध करणारा, रसाळ आणि चिंतनशील असा साहित्यिक ठेवा आहे.
‘आमचे पी.एम.’, ‘गिल्ली मिसळ’ आणि ‘कान्होला’ या यशस्वी प्रकाशनांनंतर ‘बासुंदी’ हा संग्रह प्रकाशित होत असून, तो केवळ काव्यसंग्रह न राहता वाचकांसाठी भावनांचा, विचारांचा आणि अनुभवांचा गोड आस्वाद ठरतो. जसे बासुंदीमध्ये गोडवा, पोषणमूल्य आणि समाधान असते, तसेच या संग्रहातील चारोळ्यांमध्ये जीवनाचा गोड, कडू, आंबट, तिखट असा संपूर्ण स्वाद अनुभवायला मिळतो.
या संग्रहातील चारोळ्या सामाजिक वास्तवावर नेमके भाष्य करतात.

आजकाल गैरव्यवहार, भ्रष्टाचार
शिष्टाचार झाला आहे
इमानदारी, सत्शीलता, सदाचार
नावापुरताचं उरला आहे
या चारोळीत आजच्या समाजातील नैतिक अधःपतन अत्यंत मार्मिक शब्दांत मांडले आहे. कमी शब्दांत मोठा सामाजिक आरसा उभा करण्याची कवीची क्षमता येथे प्रकर्षाने जाणवते.
कवी केवळ समाजावरच नव्हे, तर मानवी मनाच्या भावविश्वावरही सहजतेने प्रकाश टाकतो. प्रेम, विरह, आठवणी यांचे भाव हिंदी-उर्दू छटेत व्यक्त करताना चारोळी अधिक हळवी होते,
लेकिन अब तुम ना होने का
एहसास तडपाता है मुझे
ही भावना कोणत्याही भाषेच्या सीमा ओलांडून थेट हृदयाशी संवाद साधते.
आरोग्य, योग आणि सकारात्मक जीवनशैली याविषयीची चारोळी कवीचा समतोल व व्यवहार्य दृष्टिकोन दर्शवते.
नियमित योगामुळे
जीवनात येते सुख-शांती
आजच्या धावपळीच्या जीवनात अशी चारोळी मार्गदर्शक ठरते.
तसेच जीवनातील अपयश, स्वप्नभंग आणि मानसिक संघर्ष यांचे चित्रण करताना कवी संवेदनशील होतो,
मन होते छिन्न, विछिन्न
आचार, विचार विरघळूनी जातात
ही चारोळी वाचकाला अंतर्मुख करते आणि स्वतःकडे पाहायला भाग पाडते.
कवी प्रल्हादराव बोचरे यांचे लेखनातून त्यांचा शांत, संयमी आणि नम्र स्वभाव दिसून येतो. ‘बासुंदी’ हा संग्रह केवळ चारोळ्यांचा नाही, तर कवीच्या जीवनदृष्टीचा आरसा आहे.
मुक्ता पब्लिकेशन, अकोला यांनी प्रकाशित केलेला ‘बासुंदी’ चारोळी संग्रह साहित्यप्रेमी, अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी एक रसाळ मेजवानी ठरेल, यात शंका नाही. मराठी चारोळी साहित्याला नवे बळ देणारा हा संग्रह नक्कीच संग्रही ठेवावा असा आहे.
समीक्षण : सागर बाबाराव लोडम, प्रकाशक, मुक्ता पब्लिकेशन, अकोला
