मं. वि. राजाध्यक्ष – (जन्म: १९१३) ललितलेखक व समीक्षक, ‘आकाशभाषिते’, ‘खर्डेघाशी’, ‘शालजोडी’ हे ललितलेखसंग्रह ‘अम्लान’ हा टीकालेखांचा संग्रह, खेळकर शैलीने त्यांनी विविध विषय हाताळले आहेत.
हा उतारा ‘खर्डेघाशी’ या ललितलेखसंग्रहातून घेतला आहे. पुस्तकांनाही माणसांसारखी दुःखे असतात, ती आपण सहानुभूतीने जाणून घेतली पाहिजेत, हे या पाठावरून कळून येईल.
0 0 0
पुस्तकालाही आपल्यासारखीच काही शारीरिक दुःखे असतात. खरे म्हणजे ती उघड्या डोळ्यांना दिसावीत; पण नेहमीच दिसतात असे नाही. ती तऱ्हेतऱ्हेची असतात. ऊन त्यांना सोसत नाही, वारा त्यांना मानवत नाही. धूळ हा निसर्गाचाच भाग धरतीमातेचा घराघरातून वावरणारा अंश. त्यानेही पुस्तके घुसमटतात. मग पाऊसपाण्याचे तर बघायलाच नको! त्याने पुस्तकाचा पाहता पाहता लोळागोळा होतो. त्याला बुरशी चढते. ती पुसण्याचा खटाटोप केला, तर पुट्ट्यावर हिरवट पांढुरके चट्टे उठतात. त्याची सगळी रया जाते आणि बापडे पुस्तक खंगत जाते. अशी या दमट हवेची कर्तबगारी! तिला साथ उंदीर, झुरळे व अन्य कृमिकीटकांसारख्या आपल्या निसर्गबांधवांची. यांतील प्रत्येक बंधुभगिनीचे वळण व तंत्र निराळे असते.
उंदराचे तंत्र काहीसे पेंढारीपणाचे. गरज लागेल तेव्हा एकदम हल्ला. जमेल ते कुरतडून वसूल करून, मागल्या पायी पसार, पुन्हा नामानिराळा! पुस्तकांच्या बांधणीच्या खाचीत, कपाटांच्या सांध्यात जेथे कोन घडत असेल तेथे झुरळे अंडी घालतात. पुस्तक नीट झटकले तर अंड्यांची अख्खी रांग परलोकाची वाट धरते.
दुखणी म्हटली की औषधे आलीच. पुस्तकांसाठी चूर्णे, औषधांचे फवारे न निघते तरच आश्चर्य! बरे, एवढे करूनही त्यांचा उपयोग होतोच असे नाही. उगाच पुस्तके कसल्या पांढऱ्या भुकटीने माखून निघतात आणि डागळतात. रूप जाते आणि कसले भलभलते वास येतात. कोऱ्या पुस्तकाला जो छान गंध असतो, तो केव्हाच उडून जातो. पुस्तकाला विरूप करणारी ही वैदयकी अर्थात माणसांचीच. ‘रोग पुरवला पण वैदय आवर’ असे पुस्तके पुटपुटत असतील. खुद्द वैद्यच रोगापेक्षा पुस्तकांचे धिंडवडे काढतो.
वाचकही पुस्तकांचे कमी हाल करत नाहीत. पुस्तके दुमडून वाचणे, आपण कुठवर वाचले आहे हे जरा वेळाने आठवण्याची खात्री नसल्यामुळे पुस्तक उघडून उपडे ठेवणे, पानाचा कान दुमडणे, दुसऱ्या कोणी घेऊ नये म्हणून गादीखाली दडवणे असल्या क्लृप्त्यांनी चांगल्या धडधाकट पुस्तकांचाही चोळामोळा होतो. अशी मुखपृष्ठ फाटलेली, खिळखिळी झालेली बापुडवाणी पुस्तके घरोघर दिसतील.
तसाच बालहट्टाचा प्रताप! पुस्तकाचे नाकडोळे ओरबाडले जातात, अवयव अलग होतात. पुस्तकाचे अक्षरशः खेळणे होते. मुलांचा खेळ होतो; पण बापड्या पुस्तकाचा मात्र जीव जातो!
बाळलीलांच्या वरच्या इयत्ताही आहेतच. आपण साक्षर झाल्याचा साक्षात्कार चिरंजीवांना होताच बाल वॉशिंग्टनच्या आवेशात पानापानांवर ते हत्यार चालवतात. इतिहासाच्या पुस्तकातील एखादया स्त्रीला मिशी कोरून पुरुषाची सुरत आणण्याची धिटाई येते. पौराणिक कथांतील एखादया पुरुषाला स्त्रीवेश चढवण्याचा मोहही होतो. ही चित्रकलेची त्यांची पहिली पावले असतील; पण त्यांचे चिताडणे बिचाऱ्या पुस्तकांच्या उरावर का?
याला निदान पोरपणाची तरी सबब आहे; पण भल्या पोक्त माणसाने पुस्तकावर रंगीबेरंगी चिताडकाम करावे, म्हणजे काय? आणि तेही आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी! ओळीओळीखाली बटबटीत लाल-निळ्या रेघा मारणे, समासात चमत्कारिक खुणा करणे आणि कहर म्हणजे शेरेबाजी करणे. असल्या चिताडण्याने बिचाऱ्या पुस्तकाच्या अंगावर काटा उभा राहत असेल!
माझे एक अतिचिकित्सक मित्र आहेत. प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक विधानाशी त्यांचा ठाम मतभेद असतो. आणि ते कटाक्षाने तो मजकुराच्या बाजूला नमूद करून ठेवतात. परिणामी, छापील मजकुराइतकेच त्या हस्तलिखित गिचमिडीचे ओझे पुस्तकाला वागवावे लागते. त्याला दुसरे एखादे नितळ आणि निर्मळ पुस्तक पाहिल्यावर शरमल्यासारखे होत असेल, तोंड फिरवत असेल ते!
या अशा वाचकांच्या लेखनकर्मासाठी काही पुस्तकांच्या आरंभी व क्वचित शेवटीही एकदोन पृष्ठे कोरी सोडण्याची दूरदृष्टी दाखवलेली असते. त्यांचा उपयोग मात्र पुस्तकांवरील मालकीहक्क पुकारण्याकडेच केला जातो. हा पुकार तऱ्हेतऱ्हेचा असतो. कधी नुसतीच सही-कमीजास्त फर्डी, कधी संपूर्ण नाव, पदव्यांचा विस्तृत उल्लेख आणि संपूर्ण पत्ता. एवढेच नव्हे, तर पुस्तक केव्हा आणि कोठे विकत घेतले याचीही नोंद. पुस्तक केव्हा आणि कोठे वाचले याचाही कष्टाळू उल्लेख करणारे वाचक मला माहीत आहेत.
अशी पुस्तकांची आणखी दुःखे किती सांगू ! माळ्यावर अडगळीत टाकलेली, गंजलेल्या मोडक्या ट्रंकांतून कोंबलेली, केरासारखी कपाटाखाली सारून ठेवलेली असल्या पुस्तकांची काय अवस्था होत असेल! पुस्तकांच्या दुर्दैवाच्या दशावतारांपैकी एक म्हणजे फुटपाथवर उन्हातान्हात चटके खात तळत पडणे- तेही नको त्या पुस्तकांच्या संगतीत. भर उन्हात पानांचे पापड भाजले जाऊन पोळत राहण्याची पाळी त्यांच्यावर येते. शिवाय आपल्याला कोण उचलतो आणि कोणाच्या घरी जाऊन आपण पडतो याचाही त्यांना पत्ता नसतो. डोळ्यादेखत आपल्या स्वतःचा सौदा त्यांना पाहावा लागतो. पाहून मागणारी गिऱ्हाइके थोडी नसतात. हे सगळे त्यांना निमूटपणे सोसावे लागते.
पुस्तकांचे खरे मोल जोपर्यंत आपण ओळखणार नाही, तोपर्यंत पुस्तके अशीच झुरणार, तळमळणार आणि खंगणार. पुस्तकांचा नीट सांभाळ करायचा तो नुसता झुरळी-कसरीपासून नव्हे. ते दुखणे बरे करता येईल; पण वरून ग्रंथप्रेमाचा आव आणणारे वैरी मात्र नकोत!
